नीट पेपरफुटी प्रकरणी 14 आरोपीविरोधात आरोप निश्चित… आज न्यायालयात हजेरी
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
नीट पेपरफुटी प्रकरणी 14 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित, आज न्यायालयात हजर करणार!

नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व 14 आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीसाठी आज, शनिवार 21 नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर केले जात आहे. दिल्लीतील राऊज एव्हेन्यू येथील विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाचे न्यायाधीश अजय गुप्ता यांनी 18 नोव्हेंबर रोजी या 14 आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. आज औपचारिक आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून, यानंतर 25 नोव्हेंबर पासून या खटल्याची दररोज सुनावणी सुरू होणार आहे.
निश्चित झालेल्या 14 आरोपींमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी संबंधित विषयतज्ज्ञ मनीषा मांढरे, पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा हवालदार यांचा समावेश आहे. या तिन्ही तज्ज्ञांवर प्रश्नपत्रिका तयार करताना आणि भाषांतर किंवा छाननी प्रक्रियेदरम्यान गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आहे. मनीषा मांढरे यांनी एनटीएच्या गोपनीय केंद्रावरून प्रश्न मिळवले आणि आपल्या निवासस्थानी पैसे देणाऱ्या उमेदवारांचे विशेष वर्ग घेऊन त्यांना प्रश्न सांगितले.
पी. व्ही. कुलकर्णी यांनी एनटीए केंद्रावर विषयतज्ज्ञांची तपासणी होत नसल्याचा फायदा घेत भाषांतरादरम्यान चिठ्ठ्यांवर गोपनीय प्रश्न लिहून गुपचूप बाहेर नेल्याचा आरोप आहे. मनीषा हवालदार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून भौतिकशास्त्राचे गोपनीय प्रश्न इतर सहआरोपींना आर्थिक फायद्यासाठी पुरवले आणि एनसीईआरटी पुस्तकांतील परिच्छेदांवर खुणा करून मार्गदर्शन केले.
याशिवाय मनीषा वाघमारे, शेषराव सूर्यवंशी, शुभम खैरनार, शिवराज मोटेगावकर, डॉ. मनोज शिरुरे, धनंजय लोखंडे, यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, तेजस हर्षद कुमार शाह यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मनीषा वाघमारे यांच्यावर मनीषा मांढरे यांच्यासोबत कट रचून उमेदवार गोळा करणे आणि पेपर वितरणात मदत केल्याचा आरोप आहे. शेषराव बजरंग सूर्यवंशी याच्यावर सहआरोपी शुभम खैरनार याच्यासोबत मिळून उमेदवारांना पैसे घेऊन फुटलेले पेपर पुरवल्याचा आरोप आहे.
शुभम खैरनारवर राज सूर्यवंशीसोबत मिळून पेपरफुटीची साखळी चालवणे आणि उमेदवारांशी संपर्क साधण्याचा आरोप आहे. शिवराज मोटेगावकर यांच्यावर कोचिंग क्लासेसचा निकाल सुधारण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी फुटलेले प्रश्न मिळवून ते पुढे प्रसारित करण्याच्या कटात सहभागी असणे, डॉ. मनोज शिरुरे यांच्यावर गोपनीय प्रश्नपत्रिकांच्या बेकायदेशीर वितरण साखळीत सक्रिय सहभाग आणि आर्थिक व्यवहारांत मदत केल्याचा आरोप आहे.
धनंजय लोखंडेवर मध्यस्थ म्हणून काम करणे, फुटलेल्या प्रश्नपत्रिकांचा गैरवापर करून त्या उमेदवारांपर्यंत पोहोचवणे, यश यादव याच्यावर आंतरराज्यीय नेटवर्कचा भाग राहून फुटलेला पेपर इतर राज्यांतील एजंट आणि उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचा आरोप आहे. मांगीलाल बिवाल याच्यावर राजस्थानसह इतर राज्यांतील वितरण साखळीत सक्रिय सहभाग, उमेदवारांकडून पैसे गोळा करणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा आरापे आहे.
दिनेश बिवाल याच्यावर बिवाल गटासोबत मिळून प्रश्नपत्रिका मिळवणे आणि त्यांचा बेकायदेशीर व्यापार करणे, विकास बिवाल याच्यावर पेपरफुटीच्या कटात सहभागी राहून गोपनीय सामग्रीचा प्रसार करणे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्यात सहभाग असणे आणि तेजस हर्षद कुमार शाह याच्यावर मध्यस्थ व आर्थिक व्यवहारांची साखळी सांभाळणे आणि फुटलेल्या प्रश्नांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांचे व्यवस्थापन करण्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, संबंधित विषयतज्ज्ञांनी एनटीए केंद्रावर प्रश्नांच्या छाननीदरम्यान गोपनीय प्रश्न चिठ्ठ्यांवर लिहून घेतले आणि एनसीईआरटी पुस्तकांतील परिच्छेदांवर खुणा करून प्रश्न बाहेर पुरवले. सर्व आरोपींवर सार्वजनिक परीक्षा कायद्यासोबतच कॉपीराइट कायद्याच्या कलम 63 अंतर्गतही आरोप ठेवण्यात आले आहेत.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





