सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ले चिंतेची बाब…. प्रेमकुमार बोके अंजगाव सुर्जी.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ले चिंतेची बाब*
✍🏻 प्रेमकुमार बोके
सामाजिक कार्यकर्ते, क्रियाशील शिक्षक आणि लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झालेला आहे. शाळेतून घरी येत असताना त्यांच्यावर काही समाजकंटकांनी स्टीलच्या रॉडने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याचा सर्वप्रथम जाहीर निषेध.शाळेच्या जवळ असलेली पानतंबाखू टपरी सरकारच्या नियमानुसार हटविण्यासाठी आंदोलन केल्याबद्दल त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. शाळेपासून शंभर मीटर अंतराच्या आत पानटपरी किंवा विद्यार्थ्यांना व्यसन लागेल अशा प्रकारच्या वस्तू ज्या ठिकाणी मिळतात अशी दुकाने असू नये असा सरकारी नियम असताना अनेक शाळांच्या जवळच विद्यार्थ्यांना व्यसनाधीन करणारी अनेक दुकाने लागलेली असतात.त्या ठिकाणी जाऊन शाळा कॉलेजचे विद्यार्थी तंबाखू,गुटख्याच्या पुड्या,नशा वर्धक गोळ्या किंवा ज्यांनी व्यसन लागते अशा अनेक वस्तू विकत घेतात. विशेषता: मोठमोठ्या शहरांमध्ये शाळेच्या जवळच ही दुकाने आपल्याला पाहायला मिळतात. सरकारी नियम जरी असले तरी हे नियम पायदळी तुडवून हे सगळे गैरव्यवहार आपल्या देशात सुरू आहे. समाज म्हणून आम्ही सुद्धा या गोष्टी थांबविण्यात खूप कमी पडत आहो. कारण कोणालाच अशा गोष्टीशी घेणे देणे नाही.या गोष्टीचे काय दुष्परिणाम होतात याबद्दल पालकही कधी आंदोलन वगैरे करत नाही.तसेच पोलीस विभागही त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो ही अतिशय चिंतेची बाब आहे.
मागील काही वर्षात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर हल्ले होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे.देशात वेगवेगळ्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी अहोरात्र झटणारे व त्यासाठी सरकारवर दबाव आणणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते काम करीत असतात.त्यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसते.ही मंडळी सतत धोक्यामध्ये वावरत असतात.तरीसुद्धा समाजात काही चांगल्या गोष्टी घडून आल्या पाहिजे,बालपणापासून लहान मुलांवर चांगले संस्कार होऊन ते संस्कारक्षम झाले पाहिजे,समाजातून व्यसनाधीनता,गुंडगिरी,भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार कमी झाले पाहिजे यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरकारच्या नजरेत वाईट गोष्टी आणून देण्याचे कार्य करीत असतात.परंतु या वाईट गोष्टींमध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात अशी मंडळी मात्र सामाजिक कार्यकर्ते करीत असलेल्या जनजागृतीमुळे नाराज होतात.त्यांच्या काळ्या धंद्यावर त्यामुळे आच येऊन त्यांचे नुकसान होते.तसेच या भ्रष्ट,गुंड लोकांचे राजकीय सत्तेसोबत साटेलोटे असतात.मोठमोठ्या राजकीय नेत्यांचा त्यांच्यावर वरदहस्त असतो.कारण राजकीय नेत्यांना निवडणुकीमध्ये सगळ्याच गोष्टींचे सहकार्य समाजातील या हिंसक आणि विघातक प्रवृत्ती कडून होत असते. त्यामुळे त्यांची हिंमत वाढलेली असते.कोणालाही न घाबरता सगळे नियम धाब्यावर बसवून ही गुंड प्रवृत्ती आपले काळे धंदे खुलेआम करीत असतात.
अशावेळी एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजातील हे गैरव्यवहार पाहून व्यथित होतो.तो त्याविरुद्ध आवाज उठवायला लागतो. पोलिसात किंवा संबंधित विभागात तक्रार देतो.त्या गावातील,परिसरातील लोकांना संघटित करून जागृत करण्याचा प्रयत्न करतो व या दुष्ट, विघातक प्रवृत्तींना विरोध करतो.हीच गोष्ट या समाजद्रोही लोकांना सहन होत नाही.एक सामान्य कार्यकर्ता आपल्यासारख्या सर्वच गोष्टींनी बलदंड आणि परिपूर्ण असलेल्या माणसाला विरोध करतो,आपल्या भ्रष्ट कार्याबद्दल लोकांना जागृत करतो, पोलिसात तक्रार देतो यामुळे त्याचा अहंकार दुखावतो.सत्तेचे पाठबळ व पैशाने उन्मत्त झालेले तसेच पोलीस विभागाचा आशीर्वाद असलेले हे गुंड लोक मग सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास देतात.त्यांना मारण्याचे प्रयत्न करतात व समाजात आपली दहशत निर्माण करतात.त्यामुळे सर्वसामान्य माणूस अशा विघातक,गुंड प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवायला घाबरतो.
मग एखादा हेरंब कुलकर्णी सारखा समाजशील माणूस समाजाच्या हिताच्या दृष्टीने कायदेशीर कारवाई करण्यास हिमतीने पुढे येतो. तेव्हा मात्र त्यांच्यावर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न ही समाजद्रोही मंडळी करीत असतात. पोलीस विभागही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागे ताकतीने उभा राहत नाही.हेरंब कुलकर्णी यांच्या प्रकरणातही तसेच झाले.मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर मग पोलीस यंत्रणा हलायला लागली हे स्वतः हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखात सांगितलेले आहे.त्यामुळे ज्यांच्यावर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे, ज्यांच्याकडे गुंड प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याचे काम सरकारने सोपवलेले आहे तेच लोक जर गुंडांच्या पाठीशी उभे राहत असतील तर लोकांनी कोणाला न्याय मागावा ? आपल्या देशात सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय नेत्यांच्या तुलनेत कमी लेखले जाते.राजकीय नेत्यांच्या मागे हुजरेगिरी करणाऱ्या लाचारांची फौज सतत असते.परंतु जे लोक समाजात चांगल्या गोष्टी रुजविण्याचा प्रयत्न करीत असतात,त्यांच्या मागे ना समाज उभा राहतो ना सरकार ना पोलीस ! त्यामुळे या गोष्टी अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज असून सामाजिक कार्यकर्ते ज्या सर्वसामान्य लोकांसाठी आपला जीव धोक्यात घालून समाजसेवी काम करीत असतात,त्या लोकांनीच आता अशा समाजसेवी कार्यकर्त्यांची ढाल बनली पाहिजे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि त्यांचे मनोबल वाढविले पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने आपण समाजामध्ये परिवर्तन घडवून आणू शकू आणि एका चांगल्या निकोप समाजाची निर्मिती करू शकू.आपल्या भावी पिढीच्या कल्याणासाठी आपल्याला सर्वांना हे करावेच लागणार आहे.
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space