‘मातोश्रीचा तह”..उद्धवजी ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा इतिहास निर्माण करणारा…गुरुनाथ साठेलकर
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
“मातोश्रीचा तह”
उद्धव ठाकरें यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा इतिहास निर्माण करणारा…गुरुनाथ रामचंद्र साठेलकर
हजारो वर्षांपूर्वी आयोध्येमध्ये सगळे काही सुरळीत सुरू असल्याचं वरवर वाटत होतं. एकीकडे आयोध्येच्या राजसिंहासनावर बसून दशरथ पूत्र कौसल्येचा “रामाचा” राज्यभिषेक होणार होता त्याची लगबग सुरू होती, तर दुसरीकडे राजमाता कैकयीच्या मनात वेगळच काहीतरी सुरू होतं. तीला रामाला राजा झालेलं बघवणार नव्हतं. तिने वेळ साधली, आपला हेतू साध्य करण्यासाठी पती दशरथा समोर काही अटी घातल्या, त्यातून कोणत्याही परिस्थितीत राम राज्यकारभार करु शकणार नाही याची तरतूद केली. पर्यायाने रामावर वनवासात जाण्याचा निर्णय लादला गेला. राम राजा होणार या प्रतीक्षेत असलेली प्रजा दुःखी कष्टी झाली. सर्वांनी राजमातेला या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी विनवण्या केल्या मात्र ती आपल्या हट्टापासून तसूभरही हटली नाही.
दशरथ पुत्र राम कोणतेही आढेवेढे न घेता वनवासाला जायला निघाला. त्याच्या मनात ना कोणता राग किंवा मत्सर दिसला. राजवस्त्रांचा त्याग करुन वनवासात जाण्यासाठी त्यानें जसे आपले पाऊल राजप्रसादा बाहेर टाकले, तेंव्हा त्याच्या वाटेवर लोक लोळण घेत होते, अडथळा होत होते, माघार घेण्यासाठी विनवत होते, तूम्हीच राज्य कारभार करा, असा आग्रह धरत होते. मात्र राम वनवासाला जाण्याच्या निर्णयापासून मागे हटला नाही. मोह, माया, पत, प्रतिष्ठा यांचा त्याग करुन राम वनवासात गेला. त्यावेळी त्याची ज्यांनी ज्यांनी सोबत केली त्यांचा आजही गर्वाने उल्लेख केला जातोय. मात्र कैकयी आणि रामाला विरोध करणारे नेस्तनाबूत झाले.
रामाने त्यावेळी वनवासात जायचा निर्णय घेतला नसता तर, रामायण घडले नसते. रामायण घडले नसते तर राम कोणाला कळला नसता. राम म्हणजे त्यागाचं प्रतीक हे समीकरण झालं नसतं. त्याच रामाच्या तत्वाचा मुलामा लावून सूरू असलेलं राजकारणही कलियुगात दिसलं नसतं.
आज राजकरणात पद राखण्यासाठी साम – दाम – दंड – भेद या नितीचा अवलंब करून शेवट पर्यंत आटापिटा करणारी राजकारणी मंडळी सर्वदूर पाहण्यात येतात. त्या सर्वांच्या भाऊ गर्दीत 29 जून 2022 रोजी दिसलेले उद्धव ठाकरे हे भारतीय राजकारणातील दीपस्तंभ असल्या सारखे मला वाटते. त्यांनी उचललेलं पाऊल रामायणातल्या रामा पेक्षाही काही वेगळं नव्हतं. कैकयी सारखा हट्ट आताही केला गेला होता. उद्धव ठाकरे यांना वेगवेगळ्या पद्धतीने राज्यकारभार करण्यापासून रोखलं जात होतं. रामायणातल्या कैकयीच्या हट्टाचीच जणूकाही पुनरावृत्ती पदोपदी होत होती. काहींना उद्धव ठाकरे हे राजा म्हणून हवे होते तर काहीना त्यांचं पद रूचत नव्हतं.
बहुमताची चाचणी होई पर्यंत माघार घेऊ नका असा विश्र्वास देणारे शरद पवार जे राजकारणातले भीष्म समजले जातात आणि श्रीमती सोनिया गांधींसारखी राजमाते समान व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या मागे ठाम होत्या. तरीही आपल्याच विरोधात उभ्या ठाकलेल्या आपल्याच लोकांच्या विरोधात जाण्यात नैतिकता ती कसली असा निग्रह करून राजीनाम्याच पत्र हातात घेऊन स्वतः गाडी चालवत राजभवनाकडे जाणारे उद्धव ठाकरे, कोणतीही लालसा मनात न ठेवता वर्षा या राजमहालाचा त्याग करणारे उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रिपदापेक्षा शिवसैनिकांच्या मनातली पक्षप्रमुख म्हणून असलेले पद सर्वात मोठे समजून काल आपल्या राहत्या घरी परतणारे उद्धव ठाकरे त्या वनवासाला चाललेल्या प्रभूरामा सारखेच भासत होते.
फक्त शिवसैनिक नव्हे तर देशभरातले लाखो लोक उद्धव ठाकरे यांच्या तडकाफडकी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनामेमुळे आवाक झाले होते.
रामाच्या नावाने राजकारण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बंड करणाऱ्यानी जरा डोळे मिटून पाहिले तर त्यांना उद्धव ठाकरेंच्या कालच्या कृतीतून रामाच्या त्यागाची प्रचिती निश्चितच जाणवेल आणि त्याग हाच हिंदुत्वाचा मूलमंत्र दिसल्या शिवाय राहणार नाही.
उभ्या भारतवर्षात किंबहूना कलियुगात उद्धव ठाकरे यांच्यासारखा स्वतःचा आत्म सन्मान राखणारा माणूस मी तरी पाहिला नाही.
मी शिवसेना या पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी उद्धव ठाकरे यांचा प्रशंसक नाही, माझ्याकडे कोणतेही राजकीय पद नाही, मी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मतदान देखील केलेले नाही, तरीहि त्यांच्यात दिसलेला आदर्श राजकारणी मला खरोखर भावला.
इतिहासात वेगवेगळे तह आणि लढाया वाचत आलो, मात्र आपल्याच बांधवांसोबत झालेली लढाई, आपल्याच माणसांनी केलेले वार, झालेल्या जखमा आणि परकियांशी संगनमत करून केलेली खेळी उद्धव ठाकरे पहात होते, त्यात ज्यांना ते आयुष्यभर विरोधक समजत होती त्यांची त्यांना मिळालेली साथ पाहायला मिळाली.
आपल्याच माणसांना पराभूत करण्यापेक्षा किंवा बहुमताची सत्व परीक्षा अर्थात लढाई तरी कशाला ? हा निश्चय उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी केलेला हा तह ज्याला “मातोश्रीचा तह” या शीर्षकाखाली यापुढे ओळखले जावे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे ज्या धैर्याने सर्व घटनाक्रमाला सामोरे गेले त्यासाठी त्यांना,
लाल सलाम !
लाल सलाम !
लाल सलाम!
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space