नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422221908 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवराज्याभिषेक : स्वातंत्र्याचा जयघोष ..डॉ.श्रीमंत कोकाटे – प्रेरणा जनहित मंच

शिवराज्याभिषेक : स्वातंत्र्याचा जयघोष ..डॉ.श्रीमंत कोकाटे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

*शिवराज्याभिषेक : स्वातंत्र्याचा जयघोष* ..डॉ.श्रीमंत कोकाटे


आज आपण संसदीय लोकशाहीत आहोत. आपल्याला संविधानाने अनेक हक्क अधिकार दिलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. तसेच विहित अटी पूर्ण करणार्‍यांना निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्रीपदी कोणत्याही जाती-धर्माचा व्यक्ती लोकशाही मार्गाने निवडला जातो. विद्यमान नेतृत्व हे वंशपरंपरेने नव्हे, तर कर्तृत्वाने आणि लोकनियुक्त आहे.

मध्ययुगीन काळामध्ये अशी परिस्थिती नव्हती. शूद्रातिशूद्रांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, नेतृत्व करणे ही संकल्पना खूप कठीण होती. येथील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींना फक्त कष्ट करायचे, लढायचे, पण प्रतिनिधित्वचे स्वप्न पहावयाचे नाही, हा तो काळ होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करतात, ही एक महान क्रांतिकारक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायक घटना आहे.
राज्याभिषेक ही दबलेल्या, नाउमेद झालेल्या, पिचलेल्या, हताश झालेल्या एतद्देशीयांना नवचैतन्य देणारी घटना आहे.

सभोवताली मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज, कुतुबशहा राज्य करत होते. पण तो अधिकार एतद्देशीयांना नव्हता. तो महत्प्रयासाने मिळविण्याचे क्रांतिकारक कार्य छत्रपती शिवाजीराजांनी केले. त्यामुळे त्यांचा समकालीन असणारा कृष्णाजी अनंत सभासद सांगतो *हा मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही* . अर्थात शिवराज्याभिषेक ही घटना असामान्य आहे,असे सभासद म्हणतो.

मध्ययुगीन काळात राज्यकारभार करणे, पत्रव्यवहार, तह, करार, न्यायदान, चलन व्यवस्था, कृषी कायदे, करप्रणाली, संरक्षण, दळणवळण इत्यादी कार्य करण्यासाठी राज्याभिषेक अत्यावश्यक होता. जोपर्यंत राज्याभिषेक नव्हता, तोपर्यंत शिवरायांना देखील सरदाराचा पुत्र, जमीनदार, वतनदार असेच समजले जात असे. भारतात अनेक सरदार, वतनदार होते.त्यापैकी अनेक शूर, पराक्रमी, उत्तम प्रशासक होते. तरीदेखील ते कोणत्यातरी केंद्रीय सत्तेचे मांडलिक होते. त्यांना सर्वाधिकार नव्हते,त्यामुळे त्यांची प्रजा आणि ते स्वतंत्र नव्हते. शिवराज्याभिषेकाने स्वातंत्र्याचा अरुणोदय झाला.

छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. त्यांच्या राज्याभिषेकाला अनेक अडचणी आल्या. त्यावरती त्यांनी मात केली. त्यांच्या अत्यंत कणखर आणि दूरदृष्टीच्या मातोश्री जिजाऊमासाहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवाजीराजे संकटसमयी लढणारे होते, रडणारे नव्हते. रात्रंदिन काबाडकष्ट करणाऱ्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी घाम गाळला, रक्त सांडले.

राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन प्रत्यक्षदर्शी कृष्णाजी अनंत सभासद यांनी अत्यंत रसाळ, अतिरंजित,संक्षिप्त, लालित्यपूर्ण, अतिशयोक्त भाषेत केलेले आहे. त्यातील अतिशयोक्त भाग वजा केला तर त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. ते म्हणतात की वाराणसीचे थोर पंडित गागाभट्ट हे शिवराज्याभिषेकासाठी आले. शिवाजीराजांनी चार पातशहा दाबल्या. अनेक किल्ले जिंकले. पाऊण लाख घोडा लष्कर निर्मिले, त्यामुळे त्यांना राज्याभिषेक व्हावा, त्यासाठी पूर्ण नियोजन केले. अनेक मात्तबर लोक बोलाविले. बत्तीस मण सोन्याचे सिंहासन निर्मिले.६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक रायगडावर यथाविधी पार पडला.

सभासदांनी राज्याभिषेकाचे वर्णन केलेले आहे. बत्तीस मण सोन्याचे सिंहासन हा उल्लेख फक्त सभासदांच्या चरित्रात येतो. सभासद हे शिवाजीराजांच्या भोसले कुळाला राजस्थानातील उदयपूरच्या शिसोदे कुळाशी जोडतात, ही बाब विसंगत आणि अनैतिहासिक आहे. असे नामवंत प्राच्यविद्यापंडित शरद पाटील सांगतात. कारण सांप्रत युगात क्षत्रिय उरले नाहीत, असा पुकारा जर का वैदिक धर्मग्रंथ करत असतील, तर मग रजपूत तरी कसे काय क्षत्रिय उरतात? असा प्रश्न शरद पाटील उपस्थित करतात.याचा अर्थ शिवाजीराजांच्या भोसले कुळाचे मूळ वेरूळ येथीलच आहे, असे प्राच्यविद्येच्या आधारे शरद पाटील सांगतात.

सभासद सांगतात की गडावर राज्याभिषेकासाठी पन्नास हजार ब्राह्मण उपस्थित होते, हे अतिशयोक्त वाटते.डच कागदपत्रात मात्र अकरा हजार लोक उपस्थित होते, असा उल्लेख आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सभासद म्हणतात ” हा मराठा पातशहा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही”. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की तत्कालीन ब्राह्मणी धर्मानुसार मराठयांना देखील राज्याभिषेकाचा अधिकार नव्हता. कारण मराठे शुद्रच गणले जात होते. सर्वत्र म्लेंच्छ राजे असताना शिवाजी महाराज राज्याभिषेक करतात असे सभासद सांगतात,याचा अर्थ मुस्लिम राज्यकर्त्यांना राज्य करण्यास ब्राह्मणी धर्माचा आक्षेप नव्हता परंतु शूद्रांना राज्याभिषेक करण्यास विरोध होता,असे सभासद सूचित करतात.

सभासदांच्या विवेचनावरून स्पष्ट होते की मध्ययुगीन-शिव-काळात मराठा पातशाही ही संकल्पना होती. हिंदू पातशाही ही संकल्पना नव्हती.शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज देखील एका पत्रात मराठा धर्म असाच उल्लेख करतात,हिंदू धर्म नव्हे. मराठा ही संकल्पना जातीवाचक नव्हे, तर समूहवाचक आहे. मराठा पातशहा म्हणजे सर्व जाती धर्मीयांचा अर्थात रयतेचा राजा होय.

राज्याभिषेकाचे वस्तुनिष्ठ वर्णन करणारा दुसरा महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी म्हणजे इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन होय. हा राज्याभिषेकाला रायगडावर हजर होता. तो लिहितो “सहा जूनला सकाळी सात किंवा आठच्या सुमारास मी दरबारात गेलो. शिवाजीराजे एका भव्य सिंहासनावर बसले होते. सरदार, अधिकारी, प्रतिनिधी त्यांच्या समोर बसले होते. पुत्र संभाजीराजे व इतर मंत्री मानानुसार स्थानापन्न झाले होते. शिवाजीराजांनी हेन्रीला व नारायण शेणवीला जवळ बोलावले. शिवाजी राजांना मुजरा करून हिऱ्याची अंगठी भेट दिली ” त्या प्रसंगाचे व त्या ठिकाणी केलेल्या सजावटीचे इतंभूत वर्णन हेन्री ऑक्सिडेंनने केलेले आहे.
राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर हत्ती, घोडे कसे आणले असतील? याचे आश्चर्य हेन्री व्यक्त करतो. अर्ध्या जगावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांना देखील आश्चर्य वाटावे आणि त्यांनी रायगडावर येऊन शिवरायांना मुजरा करावा, हे शिवराज्याभिषेकाचे महत्त्व आहे.

राज्याभिषेकाने शिवाजी महाराज अधिकृत राजा झाले. ते छत्रपती झाले. राज्यकारभार करण्याचा त्यांना अधिकार मिळाला. राज्याभिषेकाने त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. रयतेला राजा मिळाला. हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली. हा राजकीय स्वातंत्र्याचा उद्घोष होतात. नाऊमेद झालेल्या प्रजेला राज्यकर्ता होण्याचा आत्मविश्वास राज्याभिषेकाने मिळाला. राज्याभिषेकानंतर शिवाजीराजांनी स्वतःचा शिवशक सुरू केला. राज्याभिषेकाने शिवाजी महाराज शककर्ते झाले. त्यांनी स्वतःची चलन व्यवस्था सुरू केली. सोन्याचे होन व तांब्याची शिवराई ही त्यांची चलन व्यवस्था होती.आधुनिक लोकशाहीचा पाया या शिवराज्याभिषेकात आहे.

शिवराज्याभिषेकाचा रयतेला आनंद झाला. मातोश्री जिजाऊ कृतार्थ झाल्या. शहाजीराजे-जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न साकार झाले.मावळ्यांच्या त्यागातून हा सुवर्णक्षण पाहता आला. या राज्याभिषेकाला एकूण एक करोड बेचाळीस लाख होन इतका खर्च झाला, असे सभासद सांगतात. हा पहिला राज्याभिषेक होय. त्यानंतर २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवरायांनी तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला. यामध्ये संस्कृत विद्वान असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका महत्वपूर्ण होती.या राज्याभिषेकाचे पौरोहित्य निश्चलपुरी यांनी केले. हा दुसरा राज्याभिषेक होता.

शिवाजीराजांचा भगवा ध्वज हा प्रागतिकतेचे, त्यागाचे,संघर्षाचे,न्यायाचे,प्रगल्भतेचे आणि समतेचे प्रतीक आहे.ते शोषणाचे, धर्मांधतेचे, सुडाचे,अन्याय-अत्याचाराचे प्रतीक नाही.राजपुत्र गौतम बुद्धाला *भगवा* या नावाने ओळखले जात असे.वारकरी संप्रदायाचा ध्वज हा भगव्या रंगाचा आहे.शिवराय-संभाजीराजे यांचा ध्वज भगव्या रंगाचा होता.सर्व रंग हे निसर्गाचा आविष्कार आहे.प्रत्येक रंगाचा आदर केलाच पाहिजे.रंगावरून भेदभाव करणे गैर आहे,कारण रंग भेदभाव करत नाहीत.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी रायगड किल्ला निवडला, कारण हा किल्ला सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटले जाते.सर्व जग जरी विरोधात उभे राहिले, तरी हा किल्ला जिंकणे अशक्य आहे.इतका हा किल्ला मजबूत, ताशीव,स्वतंत्र, अभेद्य आणि उंच आहे.तसेच जून पासून कोकणात प्रचंड पाऊस सुरू होतो,त्यामुळे शत्रूकडून कोकणात मोहीम काढण्याची सुतराम शक्यता नव्हती. शिवाजी महाराजांनी धार्मिक, राजकीय, भौगोलिक परिस्थितीचा यथायोग्य अभ्यास करून राज्याभिषेक समारंभ पार पाडला.

*–डॉ.श्रीमंत कोकाटे*

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

December 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031